वेगवान
पंचवटी : हिरावाडी रोडवरील (त्रिमुर्तीनगर) परिसरात एका युवकावर पूर्ववैमनस्यातून काहीतरी धारधार शस्त्राने वार केल्याची घटना मंगळवारी (दि.११) रात्री पावणे दहा वाजता घडली आहे . या घटनेत सत्तावीस वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले . हा प्रकार टोळीयुद्धातून घडला असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे .
या घटनेत सचिन शशिकांत जोशी रो हाऊस न. २ मौनगिरी सोसायटी नामक युवक गंभीर जखमी झाला आहे . याबाबत पोलिसांनी दिलेली अशी कि,गेल्या वर्षी त्रिमुर्तीनगर परिसरातील संशयित सचिन शशिकांत जोशी,रवी तुकाराम जोशी,शाम उर्फ कुशल शशिकांत जोशी,बाळा उर्फ श्रीकांत शशिकांत जोशी,कुणाल उर्फ राम शशिकांत जोशी यांचे आणि मोहन वाल्मिक कोकाटे,व्यंकटेश उर्फ गिप्पी रामयज्ञ शर्मा तसेच तेजस उर्फ बाळा शाम मंडलिक आणि रुपेश उर्फ आबा या युवकांमध्ये वाद निर्माण झाला होता .
त्यावेळी झालेल्या भांडणात अमृतधाम साईनगर येथे राहणाऱ्या व्यंकटेश उर्फ गिप्पी रामयज्ञ शर्मा या बावीस वर्षीय युवकाचा खून झाला होता . त्याच खुनाचा बदला घेण्यासाठी जोशी याच्यावर मंगळवारी रात्री बाप्पा सिताराम परिसरात पावणे दहा वाजेच्या सुमारास शाम मंडलिक,तेजस मंडलिक,भूषण मंडलिक,यश दाते आणि त्यांचे अजून काही साथीदारांनी एका चारचाकी वाहनातून येऊन धारधार शस्त्राने वार केले .
या प्राणहल्ल्यात जोशी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नवीन आडगाव नाक्यावर असलेल्या खाजगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . सदर घटनेचे वृत्त समजताच गुन्हा शोध पथकाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करीत हल्लेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र,त्यांच्या हाती कुठलेही धागेदोरे लागले नाही .
संशयित शाम मंडलिक,तेजस मंडलिक,भूषण मंडलिक,यश दाते आणि त्यांचे अजून काही साथीदारांनी हल्ला केला असल्याची फिर्याद सचिन जोशी याचे वडील शशीकांत चिंतामण जोशी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली आहे . असून बदला घेण्यासाठीच हल्ला केला असल्याचे देखील त्यांनी पोलिसांनी सांगितले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .
चौकट : पंचवटी परिसरात गेल्या काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे अनेक टोळ्या कार्यरत झाल्या होत्या . यामध्ये वर्चस्व वादाच्या लढाईसाठी अनेकदा टोळीयुद्ध करून परस्पर टोळीतील युवकांची हत्या किंवा प्राणघातक हल्ले करून त्यांना गंभीर जखमी करण्याची पद्धत सुरु झाली होती .
यावर तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी मोठ्या प्रमाणात लगाम लावत नियंत्रण मिळविले होते . मात्र,वर्षभरापासून पोलिसांची गुन्हेगारांवरील पकड सैल झाल्याने पुन्हा एकदा टोळीयुद्धाचे सावट पंचवटीकरांवर दिसून येत आहे . गेल्या वर्षी किरकोळ वादातून झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला असल्याची चर्चा असून याला पुन्हा उत्तर देण्यासाठी जखमी युवकाचे साथीदार समोरच्या युवकांवर हल्ला करून प्रतिउत्तर देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे .