वेगवान
निवडणूक आयोगाने शिंदे गटाची तीनही चिन्हं नाकारल्यावर आता शिंदे गटाला नव्या चिन्ह्यांची यादी द्यावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाने (Election Commission) आजची मुदत देण्यात आली आहे.
सकाळी 10 वाजेपर्यंत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ला म्हणजे शिंदे गटाला मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी पक्ष चिन्ह म्हणून ‘त्रिशूळ’चा आग्रह धरल्याने, तसेच थेट धार्मिक बाबींशी संबंध असल्याने शिंदे गटाला त्रिशूळ मिळाला नाही. उगवता सूर्य चिन्हं हे डीएमकेचं चिन्हं आहे. तर ‘गदा’ ही थेट धार्मिक बाबीशी संबंधित असल्याने नाकारली गेली आहे.
आता ही तीन्ही चिन्हं नाकारल्यावर शिंदे गटाला पुन्हा तीन नवी चिन्हं शोधून ती आज सकाळी 10 वाजेपर्यंत आयोगाला सुचवावी लागतील. त्यामुळे शिंदे गट आता कोणती चिन्हं देणार याची उत्सुकता आहे.
तर त्याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह मंजूर केले आहे. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला कोणतेही निवडणूक चिन्ह देण्यात आलेलं नाही. दोन्ही गटांना नावेही देण्यात आली आहे.
ठाकरे गटाचं नाव ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ असं करण्यात आले आहे. तर शिंदे गटाचं नाव ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे देण्यात आलंय. सहा चिन्हांपैकी केवळ एका चिन्हाला मान्यता देण्यात आली आहे.